नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी उत्पादक कंपन्या आणि वाहतूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अवजड वाहने आणि दुचाकी वाहून नेणाऱ्या वाहनामध्ये जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली आहे. मात्र, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर अपघात होऊ नयेत, यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९मध्ये सुधारणा करून, कठोर वाहने आणि ट्रेलरमध्ये दुचाकींच्या वाहतुकीसाठी जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली.सरकारच्या या नव्या नियमाचा मोठा फायदा वाहतूकदारांना होणार आहे. कारण आता वाहतूकदार एकाचवेळी अधिक दुचाकी वाहतूक करू शकतील. त्यामुळे पैसे, इंधन याचीही बचत होईल. सरकारने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे गाड्या वाहून नेण्याची क्षमता एकूनच ४० ते ५० टक्क्यांनी वाढेल, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, ट्रेलरचा कॅरेजचा भाग ड्रायव्हरच्या केबिनवर नसावा, असा नियमही घालून देण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या या दुरुस्तीमुळे वाहतूकदारांना आनंद झाला आहे. यापूर्वी, ट्रक किंवा ट्रेलरने 3 डेकपर्यंत वाहन लोड केले तर ते ओव्हरलोडिंगमध्ये येत होते. त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमी क्षमतेने लोड केले जात होते. आता मात्र नव्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.