नवी दिल्ली – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर आता पोलिसांकडून डिजिटल उपकरणांद्वारे फास आवळला जाणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्लीसह देशातील १३२ शहरांमधील महामार्गांवर डिजिटल उपकरणे लावली जाणार आहेत. रस्त्यांवर तैनात वाहतूक पोलिसांकडे आता बॉडी कॅमेराही असेल. त्यामुळे नियम तोडणार्या वाहनचालकांवर लगाम लावणे शक्य होणार आहे.
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालायने इलेक्ट्रॉनिक नजर ठेवणे आणि अंमलबजावणीसंदर्भात एक अधिसूचना राज्यांना जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि शहरी वाहतुकीच्या क्षेत्रात डिजिटल युगाची सुरुवात होत आहे. या माध्यमातून सरकार वाहतुकीचे नियम तोडणार्यांना लगाम लावण्यासाठी सज्ज झाली आहे, असे वाहतूक तज्ज्ञ सांगतात. वाहतूक पोलिसांच्या शरीरावर लावलेल्या कॅमेर्यात कैद झालेले व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येणार आहे. शहरांमधील चौकाचौकात तसेच महामार्गांवर वाहनचालकांकडून वसुली करणार्या वाहतूक पोलिसांवरही या माध्यमातून लगाम लागणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे महामार्गांवर भरधाव गाडी हाकणार्यांची हिट अँड रन प्रकरणात धरपकड करता येणार आहे.
नव्या व्यवस्थेत पोलिस आणि परिवहन वाहनांच्या डॅशबोर्डवरसुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. अधिक रहदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, जंक्शन, राज्यमार्गांवर ही वाहने उभी राहणार आहेत. स्पीडगन (स्पीड कॅमेरे), वे-इन मोशन आणि दुसरे डिजिटल उपकरणे लावली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारमधील पाटणा, गया, मुजफ्फरपूर, झारखंडमधील धनबाद, जमशेदपूर, रांची, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद, गाझियाबाद, कानपूर, झाशी, लखनऊ, मुरादाबाद, नोएडा, वाराणसी, गोरखपूर (एकूण १७ शहरे), उत्तराखंडमधील हृषीकेश, डेहराडून, काशिपूरसह १३२ शहरांमध्ये डिजिटल उपकरणे लावली जाणार आहेत.