नवी दिल्ली – रामायण सर्किट एक्सप्रेस ७ नोव्हेंबरला सफदरजंग रेल्वे स्थानकातून रवाना झाली होती. ही रेल्वे भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित १५ स्थानकांची भ्रमंती करणार आहे. ही रेल्वे ७,५०० किमीहून अधिकचे अंतर कापणार आहे. या मार्गावरील अयोध्या, प्रयाग, नंदिग्राम, जनकपूर, चित्रकूट, सीतामढी, नाशिक, हंपी आणि रामेश्वरम या स्थानकांवर रेल्वेचा थांबा आहे. परंतु या रेल्वेतील वेटर्सच्या पोशाखावर साधूंनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. रेल्वे विभागाने एक पाऊल मागे घेऊन त्यात बदल केला आहे.
रेल्वे विभागाने रामायण एक्सप्रेसमधील वेटर्सचा पोशाख बदलला आहे. भगव्या रंगाच्या पोशाखावर उज्जैन येथील साधू-संतांनी आक्षेप घेतला होता. रेल्वेतील वेटर्सना भगव्या रंगाचा पोशाख देणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे असे सांगत साधूंनी १२ डिसेंबरला दिल्लीमध्ये रेल रोको करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने हा बदल केला आहे.
भारतीय रेल्वे विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, वेटर्सचा व्यावसायिक पोशाख पूर्णपणे बदलण्यात आला आहे. तसदीबद्दल क्षमस्व. पोशाखातील नव्या बदलाअंतर्गत रेल्वेने वेटर्ससाठी सामान्य शर्ट, पँट आणि पारंपरिक टोपी दिली आहे. परंतु वेटर्सचे मास्क आणि हँडग्लोव्ह्ज भगव्या रंगातच असतील.
उज्जैन आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस अवधेशपुरी म्हणाले, की आम्ही रेल्वेमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. त्यामध्ये आम्ही रामायण एक्सप्रेसमध्ये अन्न-पाणी वाटप करणारे वेटर्स भगव्या रंगाचे पोशाख परिधान करत असल्याबद्दल विरोध दर्शविला होता. साधूंप्रमाणे टोपी, भगव्या रंगाचा पोशाख परिधान करणे आणि रुद्राक्षाच्या माळा परिधान करणे हिंदू धर्म आणि संतांचा अपमान आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.