मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जे शेतकरी पात्र असूनही त्यांना पैसे मिळाले नाही. एनडीआरएफच्या निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मदत केली जाईल, अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सर्वश्री अमोल मिटकरी, डॉ.रणजित पाटील यांनी मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणी नुकसान न होता काही प्रस्ताव आले होते. याबाबत तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत पंचनामे होऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे येतात. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याला पैसे मिळाले नाही. व काही शेतकऱ्यांना नुकसान झाले नसतानाही पैसे मिळाले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर देय असलेल्या बाधित शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत मदत देण्यात येईल. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून याबाबत अधिक तपासणी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही श्री.वडेट्टीवार यावेळी सांगितले.