धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हीच्या डोळ्यांबाबत मंत्री विजयकुमार गावित यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. मासे खात असल्याने ऐश्वर्याचे डोळे सुंदर असल्याचा दावा, गावितांनी केला आहे. त्यांच्या विधानाची बरीच चर्चा असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
राजकीय नेतेमंडळी कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. राजकीय टीकाटिप्पणी, शेरेबाजी यामुळे राजकीय नेत्यांचे वादविवाद सुरू असतात. अशात विजयकुमार गावित यांचे गैरराजकीय विधान चर्चेचा विषय बनले आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही विविध मंत्रीपदं भूषवलेल्या विजयकुमार गावित यांना भाजपात प्रवेश केल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी राज्यात मंत्रीपद मिळालं. नव्या सरकारमध्ये विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खात्याचं मंत्रीपद देण्यात आलं. विजयकुमार गावित यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते चर्चे आले आहेत.
“नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले” असं ते म्हणाले आहेत. उपस्थित श्रोत्यांना माशांच्या सेवनाचे फायदे सांगताना विजयकुमार गावित यांनी थेट अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे”, असं विजयकुमार गावित यावेळी म्हणाले.
वादाची शक्यता
“मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात”, असे गावित म्हणाले. “डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली दिसते”, असे गावित म्हणाले असून त्यांचे हे वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दानवेंची टीका
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी टीका केली आहे. दानवे म्हणाले की, वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे. भक्त आणि उठसुठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपच्या प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर (सोयीस्कर) भूमिका घेणाऱ्या मंडळींचे कान मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात. बरोबर ना चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसजी, असा सवाल दानवे यांनी विचारला आहे.
Minister Vijaykumar Gavit Controversial Statement Aishwarya Rai Bachchan