मुंबई – इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ सुरू होणार आहे. दरवर्षी ४०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार असून या योजनेसाठी दरवर्षी ६ कोटी रूपयांची तरतूद केली आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
या योजनेतंर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लाख तसेच अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लाख इतकी कर्जमर्यादा असणार आहे.
राज्यांतर्गत अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असून देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacqarelli Symonds) च्या रँक्रिग तसेच गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE) Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
या योजनेवर बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२ टक्के रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणा-या लाभार्थ्यांना करेल.लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटी व शर्ती,कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे,कार्यपद्धती याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित होणार आहे अशी माहिती श्री. वडेट्टीवार यांनी दिली.