मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एक महत्त्वाची घोषणा विधिमंडळात केली आहे. खासकरुन मराठी माध्यमासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, इयत्ता पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केला जाणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही शब्दांची माहिती होणार आहे. तसेच, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञानही मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा उपक्रमही राबविला जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
विधिमंडळात आज विविध आमदारांनी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यास प्रा. गायकवाड यांनी उत्तर दिले. राज्यामध्ये मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य करण्यात आला आहे. इंग्रजी किंवा अन्य माध्यमाच्या शाळेतही मराठी विषय ह सक्तीचा आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन इयत्ता पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचाही वापर केला जाणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1505967661997457412?s=20&t=y2DmnwK5sWj3wNgxIu7lWQ