पुणे – इयत्ता १२वीचा निकाल जाहीर झाल्यामुळे आता कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (४ ऑगस्ट) सुरू होणार असल्याचे सामंत यांनी जाहीर केले आहे. पदवी प्रवेशासाठी कुठलीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच, महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भातील निर्णय आठवड्याभरात घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, महाविद्यालयातील पदवी प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरीटलीस्टनुसार प्रवेश दिला जाणार आहे. या संदर्भात आज कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यात सर्व कुलगुरूंचे एकमत झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रोफेशनल कोर्ससाठी २६ ऑगस्ट पासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल. मात्र, या तारखा आम्ही संबंधित यंत्रणांशी बोलून नक्की करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एमबीए, एमसीएम, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बीएड., एलएलबी. सीईटी परीक्षा होणार आहेत. यावेळी सामंत यांनी सांगितले की, सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे. सामंत यांनी पुढे सांगितले की, पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आम्ही आठ दिवसांत निर्णय घेऊ त्याबाबत चर्चा सुरु आहे. मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल.