अहमदाबाद (गुजरात) – देशभरात विविध राज्यांमध्ये अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची घोटाळे उघडकीस येतात. परंतु गुजरातमध्ये खुद्द एका मंत्र्याने आपल्याच कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करीत घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गुजरातचे कायदामंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी त्यांच्याच विभागाच्या मुद्रांक कार्यालयावर छापा टाकून तेथे सुरू असलेला घोटाळा उघडकीस आणला. विशेष म्हणजे त्रिवेदी येथे पोहोचताच अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश देऊन दलालांशी संगनमत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या कार्यालयाचे स्टिंगही मंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांसमोरच करून घेतले. कायदा आणि महसूल मंत्री त्रिवेदी शुक्रवारी अहमदाबादमधील मुद्रांक शुल्क कार्यालयात पोहोचले, तेव्हा भ्रष्ट कर्मचारी आणि एजंट तेथे येताच पळून गेले. त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाचे वकील दीपेन दवे यांच्यामार्फत त्यांच्या विभागाचे स्टिंग ऑपरेशन केल्याचे सांगितले. दवे यांनी त्याचे ऑडिओ आणि तक्रार पत्र त्रिवेदी यांच्याकडे देताच ते कृतीत आले आणि त्यांनी आपल्याच विभागाच्या कार्यालयावर छापा टाकून भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे केले.
एका सोसायटीची १८ हजार कागदपत्रे तयार करण्याच्या बदल्यात कार्यालयात बसलेला एजंट पराग शहा याने सुमारे ७२ लाख रुपयांची मागणी केल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले. पराग शहांसारख्या एजंटला सरकारी कार्यालयात बसण्यासाठी अधिकाऱ्यांनी टेबल खुर्चीही दिल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना तोच सरकारी अधिकारी असल्याचा संभ्रम निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी स्वत: त्रिवेदी यांनीही भ्रष्ट महसूल अधिकार्यांना पकडण्यासाठी जनतेला स्टिंग करण्याचे आवाहन केले होते. विशेषा म्हणजे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी एका जाहीर सभेत गुजरातमधील महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो आणि गृहखात्यात त्या तुलनेत कमी भ्रष्टाचार असल्याचे सांगितले होते.