चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात काही उद्योजक तसेच विक्रेते अन्नधान्यांमध्ये भेसळ करून आपला माल विकत असतात. भेसळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती होताच त्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकून कडक कारवाई करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त (औषधे) उमाकांत बागमारे, औषध निरीक्षक सी. के. डांगे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप, प्रफुल टोपले, गिरीश सातकर आदी उपस्थित होते.
नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच इतर सणांमध्ये तेल, दूध, मिठाई, भगर, रवा, आदींचा उपयोग गोड पदार्थ करण्यासाठी केला जातो, असे सांगून मंत्री श्री. राठोड म्हणाले की, दुकानांमधील तसेच उद्योजकांच्या कंपनीमध्ये खाद्यतेलाचे नमुने नियमितपणे तपासावे. भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. यात कितीही मोठा उद्योजक असला तरी हयगय करू नये. प्रसंगी यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पुढील महिनाभर ही मोहीम अतिशय जोमाने तसेच त्यानंतरही नियमितपणे राबवा. यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे.
खाद्य तेलामध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना एन्जोप्लास्टी, अँजिओग्राफी आदी रोगांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले पाहिजे. चंद्रपूर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, आदी उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारा मजूर वर्ग हा गुटखा आणि खऱ्याच्या आहारी गेला असल्याचे निदर्शनास येते. गुटखा विकणाऱ्यांवर तसेच गुटख्याची निर्मिती होते त्या ठिकाणची माहिती घेऊन उद्योजकांवर धाडी टाका. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात खदानींमध्ये गुटखा सप्लाय करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करा. येत्या 15 दिवसांत या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
सन 2021- 22 मध्ये अन्नधान्याचे 251 नमुने घेण्यात आले. यापैकी प्रमाणित 176 नमुने, कमी दर्जा असलेले 8 नमुने, मिथ्याछाप 7, असुरक्षित 19 नमुने, तर 41 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 2022 – 23 मध्ये 169 नमुने घेण्यात आले असून यापैकी प्रमाणित 8, कमी दर्जा असलेली 0, मिथ्याछाप 2, असुरक्षित 0 आणि अहवाल प्रलंबित असलेल्या नमुन्यांची संख्या 159 आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी पाठपुरावा करून त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशा सूचनाही यांनी दिल्या.
गत दोन वर्षात विभागाच्या वतीने एकूण 23 धाडी टाकण्यात आल्या. यात 32 लक्ष 88 हजार 277 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ बाबत 2021 – 22 मध्ये 10 प्रकरणात आठ गुन्हे नोंद, तर 2022 – 23 मध्ये आठ प्रकरणात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
Minister Says Action Against Food Adulteration
Sanjay Rathod