मुंबई – नाशिक येथे युनियनच्या वादातून अमोल इगे या युवकाचा खून झाला. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या हत्येचा तपास करत पोलिसांनी घटनेच्या दिवशीच आरोपीस अटक केली असून, या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करून चौकशीअंती दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सदस्य सिमा हिरे यांनी नाशिक शहरात अमोल इगे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यास गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिले.
श्री.पाटील म्हणाले, अमोल इगे यांची नाशिक येथे हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी दुपारी पोलीसांनी आरोपीस भिवंडी येथून अटक केली. सद्य:स्थितीत विनोद बर्वे या आरोपीस न्यायालयीन कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. अमोल इगे यांनी जर मृत्युपूर्वी सुरक्षा मिळण्यासाठी पत्र दिले असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई न केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही पोलीस मॅन्युअल प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.