मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रीपद गमाविणारे शिवसेनेचे नेते संजय राठोड शिंदे-भाजप सरकारमध्येही दुसऱ्या एका कारणाने अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने तक्रार केली आहे. राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप संघटनेने पत्राद्वारे केली आहे. राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने आपण त्रस्त असून पूर्णपणे तणावात असल्याचे या पत्रात नमूद आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून अनेकदा छोट्या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते.
औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदींनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्री महोदयांकडे अपील करण्याची तरतुद कायद्यात असल्यामुळे औषध विक्रेते अपील दाखल करतात. या अपिलावर स्थगनादेश देणे किंवा सुनावणी लावून निर्णय देणे अपेक्षित असते. बरेचदा तर शिक्षेचा कालावधी संपून गेला तरीही मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून निर्णय दिला जात नाही. त्यामुळे अनेक सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागते. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. बंदाचे जे काही परिणाम होतील, त्याची जबाबदारी सरकारची असेल, असेही तक्रारीत म्हटले आहे.
अकारण होते शिक्षा
अन्न व औषध प्रशासनाद्वारे औषध विक्रेत्यांच्या आस्थापनांच्या कायद्यानुसार नियमित तपासण्या केल्या जातात. मात्र छोटी चुक आढळली तरी प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरता निलंबित केले जातात. शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विकेत्यांना आवाजवी शिक्षा केली जात असल्याचेही संघटनेने पत्रात नमूद केले आहे.
मंत्र्यांच्या कार्यालयातून पैश्यांची मागणी
मंत्र्यांच्या कार्यालयातूनच औषध विक्रेत्यांकडे पैश्यांची मागणी केली जाते, असा उल्लेख पत्रात करून मंत्र्यांचे खासगी सचिव, ओएसडी यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या तरीही काहीच झाले नाही. उलट भ्रष्टाचार वाढत असल्याचे दिसत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
Minister Sanjay Rathod Trouble Complaint CM