मालेगाव – वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीने केलेल्या विकास कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.
वीज वितरण कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, अधिक्षक अभियंता संजय खंडारे, आर.एस.सानप, कार्यकारी अभियंता जे.के.भामरे, आर.एम.पाटील, एम.आर.साळुंखे, आर.पी.शिवगण, पी.आर.मोरे, आर.एम.गोसावी, राजप्रशांत चक्रवर्ती, प्रकाश चंदन, प्रेम कुमार, सचिन पाटील, संजीव बरियार आदि उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री.भुसे यांनी सर्कल आणि डिव्हीजनच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. तक्रारदारांसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याबरोबर तक्रारदारांचे गाऱ्हाणे ऐकूण घ्या, त्यांना सौजन्याची वागणूक द्या, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. रस्त्यांच्या कामाला अडथळा ठरणारे रोहित्र स्थलांतरीत करण्यात यावे. सबस्टेशनची प्रलंबीत मागणी तातडीने मार्गी लावावी. नवीन रोहित्रांची मागणीसह सन 2011 पासून प्रलंबीत असलेले पेड पेंडींग निकाली काढावेत. महावितरणाच्या अपघातात दगावलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईची प्रकरणे निकाली काढावीत. मान्सूनपुर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. तर ज्या रोहित्रावर अधिकचा लोड आहे त्या ठिकाणी प्राधान्याने क्षमता वाढवून देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्कल कार्यालय ते संगमेश्वर दरम्यान एरियल बंच केबल टाकण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी दिल्या आहेत.
यावेळी मंत्री श्री.भुसे यांनी एकात्मिक उर्जा विकास योजना, दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, पायाभूत आराखडा, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कृषी धोरण 2020, पावसाळयापुर्वी देखभाल दुरुस्तीची कामे, उच्चदाब वितरण प्रणाली, सौभाग्य योजनांची माहिती जाणून घेतली. तर त्रस्त नागरिकांचे निवेदन व संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्तावित केलेल्या कामांची तात्काळ पूर्तता करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सर्कल ऑफीस ते संगमेश्वर केबलचे काम 24 तासात कार्यान्वित होणार : मुख्य अभियंता कुमठेकर
सर्कल ऑफीस ते संगमेश्वर एरियल बंच केबल चे काम येत्या 24 तासात कार्यान्वित करण्यात येईल. त्याच बरोबर 1 जुन पर्यंत भुमीगत लाईनचेही काम पूर्ण होईल असे आश्वासन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी यावेळी दिले. तर महावितरणाच्या अपघातात बळी गेलेल्या पशुधनाची भरपाई व महावितरणच्या अपघातात मयत झालेले कर्मचारी सुभाष गायकवाड यांच्या कुटूंबास दिलासा देण्यासाठी महावितरणामार्फत सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी यावेळी दिली.