नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशात महामार्गांचे जाळे विणणारे लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जयेश पुजारी याच्याकडून दोनवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दहशतवादी अफसर पाशा हा मास्टर माईंड असल्याचे लक्षात आले. सध्या नागपूर पोलीस पाशाची चौकशी करीत असून त्याने एका विशिष्ट्य रागातून गडकरींना धमकी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दोनवेळा फोन करून जयेश पुजारी याने जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी तपास केला असता जयेश पुजारी हा बंगलोरमध्ये असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली. एनआयएने देखील या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावत धागेदोरे कुठपर्यंत जातात हे तपासून बघितले. यामध्ये बंगलोरच्या कारागृहात असलेला दहशतवादी अफसर पाशा मास्टर माईंड असल्याचे लक्षात आले.
पाशाला नागपूर पोलिसांच्या पथकाने नागपुरात आणले आणि गेल्या तीन दिवसांपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) रागातून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली आहे. अफसर पाशा बेळगावच्या कारागृहातून लष्कर-ए-तय्यबाचे स्लीपर सेल चालवत होता. जयेश पुजारी या कारागृहात असताना अफसर पाशासोबत त्याची खास दोस्ती झाली. यातच पाशाने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. अफसर पाशा लष्कर ए तय्यबा आणि ‘पीएफआय’चा दहशतवादी असून त्याच्यावर युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाशा नागपुरातच राहायचा
अफसर पाशा दहशतवादाचे नेटवर्क वाढवण्यासाठी तो २००३-०४ या कालावधीत मध्य नागपुरात राहायचा, अशीही माहिती त्याने स्वतःच दिली आहे. या कालावधीत त्याने अनेकांच्या भेटी घेतल्या. पोलीस आता त्याही लोकांचा शोध घेत आहेत.
बंगळुरूमध्ये हल्ला
दहशतवादी अफसर पाशा अनेक वर्षांपूर्वीच बांगलादेश आणि सौदी अरेबियात जाऊन दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. बांगलादेश आणि सौ अरेबियातून आल्यानंतर त्याने बंगळुरु येथे दहशतवादी हल्ला केल. कर्नाटकातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असताना अफसर पाशाने आतंकवादी नेटवर्क वाढवले.