इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्यासमोर अनेकदा अपघात होत असतो, किंवा झाला असेल असे चित्र असताना त्या अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी कुणीही शक्यतो धजावत नाही. कशाला यात पडायचं अशी विचारधारा आजही समाजात दृढ आहे. मात्र आपले एक पाऊल कुणाच्या वडिलांचे, मुलाचे, नवऱ्याचे किंवा अजून कुणाचा जीव वाचवू शकते. हे विचार या समाजात रुजू झाले पाहिजेत, अशाच आशयाचा एक व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमार याचा असल्याने खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.
अक्षय कुमार हा एक उत्तम अभिनेता आहे. मात्र तो एक उत्तम माणूसदेखील असून सामाजिक कार्यातही तो मागे नाही. काही महत्त्वाच्या विषयांवर लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम तो करतो. विविध समाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या जाहिरातींमध्ये तो प्रामुख्याने दिसतो. रस्ता सुरक्षेच्या एका जाहिरातीत त्याने नुकतेच काम केले असून नागरिकांना प्रवास करताना घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेची त्याने माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षय कुमारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत अपघातग्रस्तांना मदत केल्याने वडील मुलाला ओरडत असतात. आता आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागणार असे म्हणत ते ओरडत असतात. तेव्हाच अक्षय कुमार घरी येऊन त्यांच्या मुलाने केलेल्या मदतीबद्दल त्याचे कौतुक करतो. एवढेच काय तर त्यासोबत सेल्फी घेत माणसाच्या आयुष्याची किंमत समजणाऱ्या मुलाला जन्म दिल्याबद्दल, चांगले संस्कार दिल्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद मानतो. देश आता सुरक्षित हातात असल्याचे म्हणतो.
अपघातग्रस्तांचे प्राण महत्त्वाचे असून रस्ते परिवहन मंत्रालयाने त्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी कायद्यात अनेक बहुमूल्य बदल केले आहेत. आपल्याला ते आजही माहित नसल्याने अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोक फोटो व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकण्यात जास्त रस घेतात. तेव्हा देशव्यापी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. हेल्मेट सक्ती कंटाळवाणी वाटत असली तरी ती किती महत्त्वाची आहे.
सीटबेल्ट का लावला पाहिजे असे मुद्यावर जनजागृती केली जात आहे. यासाठी अक्षय कुमार सारखा अभिनेता आपले योगदान देत आहे. तेव्हा “अक्षय कुमार, देशव्यापी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल तुझे आभार. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचे तुझे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. आम्ही जागरूकता आणि लोकसहभागाने भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले. यापूर्वीदेखील अभिनेता अक्षय कुमार रस्त्यावरून प्रवास करताना आपली सुरक्षेची काळजी आपण कशाप्रकारे घेतली पाहिजे, हे सांगणाऱ्या अनेक जाहिरातींमध्ये दिसला आहे. आता पुन्हा एकदा अक्षयने या जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती केल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/akshaykumar/status/1568497521626054656?s=20&t=cMqmPbgGZc0zUNyOKQ9p2w
Minister Nitin Gadkari Thank you to Actor Akshay Kumar
Road Safety Rules Awareness