इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी बदलत्या काळातील वास्तविकता आणि देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन साखरेच्या उत्पादनातून साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन साखर कारखानदार, उद्योजकांना केले. सद्यस्थितीप्रमाणे केवळ साखर उत्पादनाकडेच लक्ष दिले तर आगामी काळात ते उद्योगासाठी संकटकाळ ठरेल, असे साखर आणि संबंधित उद्योग प्रमुखांना सांगितले. सध्या आपल्याकडे तांदूळ, मका, आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे, याची आठवण करून देत गडकरी म्हणाले की, साखरेचे उत्पादन कमी करणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले आहे.
साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स (SEIC) 2022 ला नितीन गडकरी यांनी आज संबोधित केले. साखर आणि संबंधित उद्योगांसाठी बातम्या आणि माहिती देणारे पोर्टल, ‘चिनीमंडी’ द्वारे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. देशांतर्गत आणि जागतिक साखर व्यापारातील प्रमुख आव्हाने आणि जोखीम प्रतिसाद धोरणे आणि साखर उद्योगाच्या भविष्यातील मार्गावर चर्चा करण्यासाठी आघाडीच्या आणि जागतिक उद्योग तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणणे आणि आणि भारतात अधिक नाविन्यपूर्ण आणि शाश्वत साखर आणि इथेनॉल क्षेत्र तयार करण्यासंबंधी उहापोह करणे हा परिषदेचा उद्देश.
इथेनॉलचे लाभदायी आर्थिक समीकरण
डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इथेनॉलचे आर्थिक समीकरण कसे लाभदायक आहे, हे गडकरी यांनी स्पष्ट करुन सांगितले. “आम्ही फ्लेक्स इंजिन्ससंदर्भात सूचना जारी केली आहे; टोयोटा, ह्युंदाई आणि सुझुकी यांनी मला आश्वासन दिले आहे की ते सहा महिन्यांत फ्लेक्स इंजिन आणतील. अलीकडेच, आम्ही ग्रीन हायड्रोजनवर चालणारी पथदर्शी कार बाजारात आणली आहे. टोयोटाच्या अध्यक्षांनी मला सांगितले की त्यांची कार फ्लेक्सइंजिन असलेली आहे. ज्या 100% इथेनॉलवर चालतील आणि त्यातून 40% वीज निर्माण होईल आणि एकूण अंतराच्या 60% अंतर हरित इंधनाने कापतील. पेट्रोलच्या तुलनेत हे आर्थिक समीकरण अत्यंत फायदेशीर ठरेल.
नितीन गडकरी यांनी महिती दिली की, शासनाने देशातील नागरिकांसाठी इथेनॉल भरण्यासाठी बायोफ्युएल आउटलेट उघडण्याचा निर्णय घेतला आहे आणि कार, स्कूटर, मोटार सायकल आणि रिक्षा फ्लेक्स इंजिनवर लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होतील. “पंतप्रधानांनी पुण्यात तीन इथेनॉल पंपांचे उद्घाटन केले; मात्र, इथेनॉल भरण्यासाठी आतापर्यंत कोणीही आलेले नाही. तथापि बजाज, टीव्हीएस आणि हिरो यांनी फ्लेक्स इंजिनने चालवल्या जाणार्या मोटार सायकली बाजारपेठेत आणल्या आहेत, स्कूटर आणि मोटर सायकल फ्लेक्स इंजिनवर उपलब्ध आहेत. लवरकच बाजारात फ्लेक्स इंजिनवरील ऑटो रिक्षाही येणार आहे”.
साखर कारखान्यांनी आपल्या कारखान्यांमध्ये आणि इतर भागात इथेनॉल पंप सुरू करण्याचे आवाहन करतो, ज्यामुळे 100% इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि कार बाजारात मोठ्या प्रमाणात येतील. तसेच इथेनॉल वापरामुळे प्रदुषण कमी होईल आणि स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती होईल.
“इथेनॉलसाठी निश्चितच मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल”
इथेनॉलसाठी पुरेशी मोठी बाजारपेठ असेल की नाही याची कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे गडकरी यांनी उद्योजकांना आश्वासन दिले. इथेनॉल हे हरित आणि स्वच्छ इंधन आहे; आपण सध्या 465 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करत आहोत. तथापि, जेंव्हा ई-20 कार्यक्रम पूर्ण होईल, तेंव्हा आमची गरज सुमारे 1,500 कोटी लिटरची होईल. शिवाय, येत्या पाच वर्षांत, फ्लेक्स इंजिन निर्मिती झाल्यानंतर इथेनॉलची मागणी 4,000 कोटी लिटर होईल.” त्यामुळे तुम्ही जर साखरेचे इथेनॉलमध्ये रुपांतर केले नाही, साखरेचे उत्पादन सुरूच ठेवल्यास कारखाना तोट्यात जाईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला. उसाच्या रसापासून सरबत तयार करणे आणि त्यापासून इथेनॉल तयार करणे हा एक व्यवहार्य पर्याय आहे, असेही ते म्हणाले.
साखर कारखान्यांनी मळी (B molasses) कडे वळावे. डिसेंबर 2023 नंतर आम्ही साखर निर्यात अनुदान बंद करू, असे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याने बी- मोलॅसिसवर भर द्यावा. साखर उत्पादनाला परावृत्त केले तरच साखरेला वाजवी भाव मिळू शकेल. सरकारने बी-IV मोलॅसिससाठी 245 कोटी लिटर राखीव साठा ठेवला होता; तथापि, 55 कोटी लिटर किंवा 22% पुरवठा केला गेला आहे, ज्यात लक्षणीय तफावत दिसून येते. साखर कारखान्यांनी तुटलेल्या तांदळापासून इथेनॉलनिर्मितीवरही लक्ष द्यावे, असे गडकरी म्हणाले. ब्राझीलने इथेनॉलपासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवले आहे, जे आपल्याकडेही करता येईल.
हवाई वाहतूक क्षेत्रासाठी (एव्हिएशन) इथेनॉलचा वापर
नितीन गडकरी यांनी सांगितेल की, विमान वाहतूक क्षेत्रात आणि भारतीय हवाई दलात इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या मार्गांवर सरकार विचार करत आहे. “हवाई वाहतूक क्षेत्रात इथेनॉल कसे वापरायचे यावर मी हे देखील मी संशोधन करत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या लढाऊ विमानांनी 100% बायो-इथेनॉल वापरले होते. मी हवाई दल प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे; विमान वाहतूक आणि भारतीय हवाई दलात इथेनॉलचा वापर कसा वाढवता येईल यावर आम्ही विचार करत आहोत.” चार लाख दूरसंचार मोबाईल टॉवरमध्ये इथेनॉल वापरण्यासंदर्भातही आपण विचार करू शकतो, असेही गडकरी म्हणाले.
इथेनॉल: आयातील पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उपाय
साखरेचे उत्पादन कमी करणे आणि साखरेचे इथेनॉलमध्ये वाढते रूपांतरण याशिवाय देशातील साखर उद्योगांसमोर कोणताही पर्याय नाही यावर मंत्र्यांनी भर दिला. या दिशेने आपल्याला वेगाने प्रगती करायची आहे, असे ते म्हणाले. आपल्याला हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे, त्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. “आपल्या देशातील एकूण पेट्रोलियम आयात सध्या 8 लाख कोटी रुपये आहे, ती पुढील 5 वर्षात 25 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 25 लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीमुळे आर्थिक समस्या निर्माण होईल. शिवाय, एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा ओघ आल्याने नवीन समस्या निर्माण होतील. त्यामुळे आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उपायांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे नमूद करून गडकरी यांनी इथेनॉल आणि हरित इंधनाचा वापर करण्यावर भर दिला.
शेतकऱ्यांनी वीज पुरवठादार बनले पाहिजे
भारताला ऊर्जा निर्यात करणारे राष्ट्र बनण्याची गरज, शेतकऱ्यांनी वीज पुरवठादार बनले पाहिजे. नितीन गडकरी यांनी हरित इंधनाकडे वळण्याची आणि कृषी क्षेत्राला ऊर्जा आणि वीज क्षेत्रात वैविध्य आणण्याची तातडीची गरज विशद केली. “इथेनॉल, मिथेनॉल, बायोइथेनॉल, बायो-सीएनजी, बायोडिझेल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक हेच भविष्यातील इंधन आहे. ऊर्जा आयात करणारे राष्ट्र होण्यापासून आपण ऊर्जा निर्यात करणारे राष्ट्र बनले पाहिजे. आपल्याला फक्त धान्य पुरवठादार राहून चालणार नाही, शेतकऱ्यांना वीज पुरवठादार बनवण्याची गरज आहे; कारण सध्या आपल्याकडे धान्य मुबलक आहे आणि वीज तुटवडा आहे. .” साखर कारखान्यांनी याचा गांभीर्याने विचार केल्यास हा कायापालट झपाट्याने होईल, असे मंत्री म्हणाले.
इलेक्ट्रिक कारचे महत्त्व आणि वाढता अवलंब आणि आयात कमी करण्यात त्यांची भूमिका नितीन गडकरी यांनी अधोरेखित केली. “इलेक्ट्रिक कार इतक्या प्रमाणात सादर केल्या जात आहेत की, एक ते दीड वर्षात पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार उपलब्ध होतील.” असे गडकरी म्हणाले.
“एलएनजी देशासाठी भविष्यातील इंधन”
नितीन गडकरी म्हणाले की, एलएनजी हे साखर उद्योग क्षेत्रासाठी आणि देशासाठी भविष्यातील इंधन आहे. “एलएनजीचे आर्थिक समीकरण खूप लाभदायक आहे. बायोमास बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजीमध्ये रूपांतरित करणे खूप सोपे आहे. आम्ही पाइपलाइनद्वारे सीएनजी पुरवण्याची योजना आणली आहे, सर्व ठिकाणी सीएनजी पंप सुरू होत आहेत, एलएनजीही उपलब्ध होत आहे; त्यामुळे आपण गॅसआधारीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे सरकारचे प्राधान्य पेट्रोल आणि डिझेलऐवजी सीएनजी आणि एलएनजीला आहे. आगामी काळात बायोमास आणि बायो-सीएनजीसाठी बायोमास वापरणे खूप फलदायी ठरेल.”
बांबूपासूनही बायोइथेनॉल बनवता येते, असे गडकरी म्हणाले. “येत्या काळात पडीत जमिनीवर बांबू लागवड करण्याची संधी आहे. बांबू पांढऱ्या कोळशाच्या स्वरूपात वापरले जाऊ शकते; यामुळे कोळशाची आयात कमी होण्यासही मदत होईल.”
उद्योगांनीही ग्रीन हायड्रोजनचा विचार केला पाहिजे, असे गडकरी यांनी नमूद केले. “हरित हायड्रोजन उपलब्ध होण्याचा दिवस फार दूर नाही. शहरांतील महापालिकेच्या कचऱ्यापासून वेगळे केलेल्या सेंद्रिय कचऱ्यापासून मिथेनची निर्मिती करता येते. कार्बन डाय ऑक्साईड यापासून वेगळे केल्यावर ग्रीन हायड्रोजन, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी देखील तयार होऊ शकतात.
सांडपाण्यापासूनही ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल, असे गडकरी यांनी सांगितले. “नगरपालिका आणि महानगरपालिकेत सांडपाणी सहज उपलब्ध आहे. यासाठी एक इलेक्ट्रोलायझर विकसित केले गेले आहे ज्याद्वारे सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते”.
नितीन गडकरी यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा