मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणजे रोखठोक भूमिका घेणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. स्वतःचे मंत्रालय असो, पक्ष असो वा प्रशासन असो, गडकरी अगदी स्पष्ट भूमिका मांडतात. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांना मोठा सल्ला दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांच्या बाबतीत या मुलाखतीत गडकरींची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर गडकरींनी एका शब्दात ‘हास्यास्पद’ अशी प्रतिक्रिया दिली. पण त्याचवेळी त्यांनी विरोधकांच्या मॅच्युरिटीवरही प्रश्न उपस्थित केला. विरोधी बाकावर असताना विरोधात बोलायचे असते, याची मला जाणीव आहे. मी स्वतः अनेक वर्षे विरोधात होतो. विरोधीपक्षनेताही होतो. पण विरोध करताना त्यात मॅच्युरिटी दिसायला हवी. विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये अशी कुठलीही मॅच्युरिटी बघायला मिळत नाही, असे गडकरी म्हणाले.
लोकांचा विश्वास बसेल, असा आरोप विरोधकांनी करायला हवा, असेही ते म्हणाले. यावेळी गडकरी यांनी कॅगच्या अहवालाबाबतही प्रतिक्रिया दिली. कॅगला सुरुवातीला जो नियोजित खर्च दिला होता, त्यात नंतर झालेली सुधारणा लेखी स्वरुपात कळविण्यात आली नाही, एवढाच विषय आहे. भ्रष्टाचाराचा आरोप चुकीचा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
आमच्याकडे इको-फ्रेंडली साबण
ज्या नेत्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करते, त्यांच्या मागे चौकशी लावते, त्याच नेत्यांना नंतर पक्षात घेते. यामागचे कारण विचारले असता गडकरींनी भाजपकडे इको-फ्रेंडली साबण आहे, असे उत्तर दिले.
निवडणुका पाहून काम करत नाही
निवडणुका जवळ आल्यामुळे एवढ्या विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन होत आहे का, असा प्रश्न विचारला असतान नितीन गडकरी यांनी मी निवडणुका बघून काम करत नाही, असे उत्तर दिले. त्याचवेळी त्यांनी देशात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत असून तेच भारताचे भविष्य असल्याचे सांगितले.