नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू असताना एखाद्या मंत्र्याने अचानक बाहेर पडणे ही राष्ट्रीय बातमी होऊ शकते. अर्थात आजपर्यंत तसे झालेले नाही. पण, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत दिल्लीत झालेल्या मंत्री परिषदेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अचानक बाहेर पडल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांचा धडाडा सर्वांना माहिती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रस्त्यांचे जाळे विणणारे नितीन गडकरी हे केंद्रातील बेस्ट परफॉर्मर मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांची व्यस्तता आणि कामांचा सपाटा बघता प्रकृतीकडे बरेचदा दुर्लक्ष होत असते. असेच काहीसे सोमवारच्या बैठकीत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत मंत्री परिषद सुरू होते. मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्री उपस्थित होते.
सर्वांना तसे आदेशच होते. ही बैठकही पूर्वनियोजित होती. त्यामुळे सर्वांना उपस्थित राहणे अनिवार्य होते. अश्यात बैठक संपायला २० मिनिटे शिल्लक असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षण त्यांनाही कदाचित कळले नसावे. पण यापूर्वीही हा त्रास झालेला आहे आणि तो शुगर वाढल्याने होत आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पंतप्रधानांची व सभागृहाची परवानगी घेतली. ते बैठकीतून बाहेर पडले आणि थेट दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी औषधे घेतली आणि काही वेळ आराम केला.
नितीन गडकरी यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरला. पण त्याला प्रकृतीचे कारण असल्यामुळे सर्वांनीच चिंता व्यक्त केली. काही वेळाने बैठक संपल्यानंतर बऱ्याच मंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती व्यस्थित झालेली होती. गडकरी यांना डायबीटीज आहे. त्यामुळे त्यांना कुठेही असले तरीही शुगरची काळजी घ्यावी लागत असते. एखाद्या वेळी दुर्लक्ष झाले तर त्यांना त्रास होत असतो.
गडकरींची ही पहिली वेळ नाही
नितीन गडकरी यांना यापूर्वीही आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे त्रास झाला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोलापूर येथे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना एका औषधाच्या डोजमुळे त्रास झाला होता. २०१० मध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना जंतरमंतरवर देखील त्यांना भोवळ आली होता. गेल्यावर्षी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा शुगर कमी झाल्याने गडकरींना भोवळ आली होती.