मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसामुळे सध्या जवळपास सर्वच रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होत आहे. खासकरुन वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. शिवाय यामुळे रस्ते अपघातही घडत आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. राष्ट्रायी महामार्गांवरील खड्ड्यांबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, पुणे-कोल्हापूर महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, औरंगाबाद-सोलापूर महामार्ग, धुळे-औरंगाबाद महामार्ग अशा जवळपास सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर खड्डे पडले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही रस्त्याची चाळण झाली आहे. यासंदर्भात गडकरींनी घोषणा केली की, कोणत्याही महामार्गावरील खड्डे येत्या तीन दिवसात बुजवले जातील. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी नवे अॅप तयार केले जाणार आहे, असेही गडकरींनी सांगितले आहे. गडकरी पुढे म्हणाले की, जे टोल बुथच्या एका बाजूला राहतात आणि त्यांना टोल क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जावे लागते, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोज कामाला जाणाऱ्यांना टोल लागू नये, यासाठी नवीन पॉलिसी आणली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. काही ठिकाणी रस्ता चांगला असल्यामुळे वाहने भरधाव वेगात येऊ लागली आहेत. मात्र, समोर अचानक खड्डा दिसल्यानंतर चालक ब्रेक लावत असल्याने वाहने उलटणे तसेच खड्यात वाहने आदळून अपघात होण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. पुणे-दिघी बंदर राष्ट्रीय महामार्गावर पौंडच्या पुढे दिसली गावात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
काल रविवारी सायंकाळी या खड्ड्यांमुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. पुणे-कोलाड महामार्गावर बऱ्यापैकी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकर्यांनी आक्षेप घेतल्यामुळे येथील रस्ता होऊ शकला नाही. तसेच, पावसाळ्यापूर्वी येथे पडलेले खड्डे रस्ता करणार्या कंपनीने बुजविले नाहीत. त्यातच जोरदार पावसामुळे दिसली गावातील रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ मधील रस्त्यामध्ये पडलेले खडे, साचलेले पाणी, गाळ काढण्याचे काम त्वरित करा अन्यथा टोल बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया यांना एका पत्राद्वारे दिले आहे. सदरील पत्रात त्यांनी नमूद केले आहे की मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ हा पालघर जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणारा एकमेव महामार्ग आहे.
Minister Nitin Gadkari On National Highway Potholes