नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. सध्या तर या किमती गगनाला भिडल्या आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळेच अन्य प्रकारची वाहने आणि इंधन वापराचे पर्याय शोधण्यात येत आहेत.
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांची हा पर्याय उपयुक्त असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. त्याकरिता परदेशी कंपन्या भारतात याव्यात आणि त्यांनी इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करावीत यासाठी गडकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने बनवली तर त्याचा कंपनीलाही फायदा होईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी एका कार्यक्रमात म्हणाले की, आता तो दिवस दूर नाही जेव्हा देशातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या किमतीपेक्षा कमी असेल. जर टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक कार बनवल्या तर त्यांनाही फायदा होईल. पण भारतीय कंपन्यांनी चीनमधून कार आयात करू नये.
या पुर्वी ते म्हणाले होते, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क भारतात कार बनवण्यास तयार असतील तर काही हरकत नाही तसेच ते निर्यात करू शकतात. दरम्यान, गेल्या वर्षी, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला सांगितले की, सरकारने कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी कंपनीने भारतात आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले पाहिजे.