इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात आज जोरदार चर्चा आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या ‘वजनदार’ ऑफरची! भाजप खासदाराला दिलेली ही ऑफर म्हणजे भन्नाटच सरप्राईज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. खास म्हणजे, खासदारानेही या ऑफरचा दिलखुलास स्विकार केला आहे. त्यामुळे आता ही ऑफर पूर्ण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आजच्या काळात केवळ सर्वसामान्य माणसालाच नव्हे तर राजकीय नेत्यांना देखील आपल्या वजन वाढीची समस्या जाणवू लागली आहे. सहाजिकच बहुतांश वजनदार नेतेही आपले शारीरिक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र काही जणांचे वजन कमी झाले तर काहींचे अद्याप तसेच आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील आपले स्वतःचे वजन कमी केले आहे. त्यामुळेच गडकरी यांना अन्य भाजप नेत्यांनी देखील आपले शारीरिक वजन कमी करावे असे वाटते. त्यामुळे त्यांनी एका भाजप खासदाराला वजन कमी करण्याचे चॅलेंज दिले होते. त्या बदल्यात मतदारसंघासाठी प्रचंड निधी देण्याची घोषणा देखील केली होती, आता या खासदाराने हे चॅलेंज जिंकल्याने गडकरी यांना हा निधी द्यावा लागणार आहे.
या प्रकरणामध्ये संबंधित खासदाराच्या मतदारसंघातील विकासकामे मात्र होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनमध्ये भाजपा खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी कमी केलेल्या प्रत्येक एक किलो वजनामागे १ हजार कोटी रुपये विकास निधी देण्याची घोषणा केली. यानंतर खासदार फिरोजिया यांनी ४ महिन्यात १५ किलोग्रॅम वजन कमी केलं. त्यामुळे त्यांना गडकरींकडून १५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे नितीन गडकरी हे सुमारे ४ महिन्यापूर्वी उज्जैनला विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले असताना वक्तव्य केलं होतं.
गडकरींनी खासदार अनिल फिरोजिया यांना आव्हान दिले. त्यावेळी त्यांचे वजन १२७ किलो होते. तेव्हा गडकरी यांनी फिरोजिया यांना कमी होणाऱ्या प्रतिकिलो वजनामागे १ हजार कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचे कबूल केल्यानंतर फिरोजिया यांनी तातडीने व्यायामाला सुरुवात केली. तसेच त्यांनी व्यायामासोबतच डायट देखील सुरू केला. ४ महिन्यांच्या सातत्यापूर्ण व्यायाम आणि आहाराच्या सतर्कतेनंतर आता फिरोजिया यांनी १५ किलो वजन कमी केलं. यामुळे ते १५ हजार कोटी रुपये विकास निधी मिळवण्यासाठी योग्य ठरले आहेत.
त्यावेळी गडकरी म्हणाले, माझे वजन १३५ किलोग्रॅम होते, ते आता वजन ९३ किलो आहे. त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. सहाजिकच वजन कमी केल्यानंतर अनिल फिरोजिया म्हणाले की, मी जगातील सर्वात महागडा खासदार आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी उज्जैनच्या विकासासाठी ६ हजार कोटी रुपये दिले आहेत. मी आता १५ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की आम्हाला विकास कामांसाठी आणखी निधी मिळू शकतो.