नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी चार वर्षांपासून हालअपेष्टा सहन केलेल्या एका तरुणाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर नोकरी मिळाली. ना. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात या तरुणाच्या आईने ना. गडकरी यांचे आभार मानले आणि ‘साहेब, तुमच्यामुळे कुटुंब सावरलं’ असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला. नेहमीप्रमाणे मागण्यांसाठी गर्दी करणाऱ्यांसोबतच काम झाले म्हणून ‘आभार’ मानणाऱ्यांनीही ना. गडकरी यांची भेट घेतली. ललित धुर्वे याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करीत होता. चार वर्षे काहीच झाले नाही. अखेर काही दिवसांपूर्वी ललित व त्याच्या आईने ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली आणि कैफियत मांडली. दरम्यानच्या काही दिवसांमध्ये ना. श्री. गडकरी यांच्या कार्यालयाकडून झालेल्या प्रयत्नांमुळे ललितला नोकरी मिळाली. आज जनसंपर्क कार्यक्रमात तो आईसोबत आला आणि ना. श्री. गडकरी यांचे आभार मानले. आईच्या डोळ्यातील अश्रू बघून मुलालाही गहिवरून आले.
जनसंपर्क कार्यक्रमात कृत्रिम हात व पायाच्या मागणीसाठी काही दिव्यांग बांधवांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेतली. कर्करोगग्रस्त तरुणी, मूत्रपिंडाचा आजार असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचे पालक, रोजगाराची जिद्द ठेवून ई-रिक्षाची मागणी करणारा दिव्यांग आदींनी मंत्री महोदयांची भेट घेतली. ना. श्री. गडकरींनी त्यांना मदतीचा विश्वास देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना सूचना दिल्या. डॉ. बी.ओ. तायडे यांना काही दिवसांपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणे आज ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
नागरिकांची गर्दी
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
खेळाडूंचे कौतुक
आठ राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणारी मृणाली बानाईत व तिचा भाऊ श्रूमल बानाईत यांचे ना. श्री. गडकरी यांनी कौतुक केले. दोन्ही योगपटूंना पदक प्रदान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. मृणाली बानाईत हिने दोनवेळा ‘खेलो इंडिया’मध्ये दमदार कामगिरी केली आहे.