पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे ते नाशिक मार्गावरुन रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. नाशिक फाटा ते खेड या ३० किमी रस्त्यालगत इलिव्हेटेड हायवे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता आता डबलडेकर होणार आहे. गडकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. नाशिक फाटा ते खेड रस्त्याची जुनी निविदा रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी समोर आणले आहे.
नितीन गडकरी याविषयी म्हणाले, “पुणे ते नाशिक मार्गावर वाढणारी वाहतूक पाहता पुढील ४० वर्षांचा विचार करून आराखडा तयार केला जात आहे. आता या मार्गावर इलिव्हेटेड म्हणजेच दोन मजली रस्ता केला जाणार आहे. खाली रस्ता, पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर प्रत्येकी सहा मार्गिका असणार आहेत. पुणे ते शिरूर आणि अहमदनगर, औरंगाबाद या जुन्या रस्त्यावर तीन मजली रस्त्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. तसेच तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने त्या दिशेने वळवता येतील. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचे काम सुरू आहे.” गडकरींनी ट्विटदेखील केले असून, यामध्ये मेट्रोसाठीची तरतूद करण्यात आली असल्याचे म्हणले आहे. यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून अहवाल निश्चितीनंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1565612051841527808?s=20&t=LxwHCuDP9leskjvxVX9x7g
मागील आठवड्यात पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते, पुणे ते शिरुर आणि अहमदनगर ते औरंगाबादच्या जुन्या रस्त्यावर तीन मजली इलिव्हेटेड रस्ता बांधणीचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे ते शिरुर यादरम्यानही अशाचप्रकारे रस्ता तयार केल्यास मुंबईवरुन येणारी वाहतूक वळवता येईल.
नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहे. त्याठिकाणीही इलिव्हेटेड रस्ता पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करुन करण्यात येईल. तसेच पुणे शहराजवळ चाकण एमआयडीसीलगत पावलेवाडी येथे १८० हेक्टर मल्टी स्टोरेज लॉजिस्टिक पार्कदेखील तयार करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे मालवाहतूकीचे ट्रक त्या ठिकाणावरुन जातील. पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा विचार आहे, असंदेखील गडकरी म्हणाले.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1565612054043496448?s=20&t=LxwHCuDP9leskjvxVX9x7g
Minister Nitin Gadkari Announcement for Nashik Pune Highway