मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अतिशय आक्रमकपणे टीका केली. आव्हाड यांचा चेहरा नागासारखा असल्याचेही ते म्हणाले. याची दखल घेत आता आव्हाडांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले की, मला माझ्या चेहऱ्याचा अभिमान आहे. मात्र, राज यांनी आत्मपरीक्षण करावे की त्यांचा चेहरा कोणत्या कोंबडी सारखा आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही. आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा! जश्यास तसे हि संत तुकारामाची शिकवण, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1513954416860098560?s=20&t=KpMZKitXmLn9MjH2XrUC6w
आव्हाड यांनी राज यांची तुलना आता थेट जॉनी लिवर यांच्याशी केली आहे. त्यामुळे यावर आता मनसे पदाधिकारी आणि राज यांच्याकडूनही जोरदार उत्तर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यात या दोन्ही नेत्यांमध्ये नजिकच्या काळात चांगलीच जुगलबंदी रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, आव्हाड म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यांचा त्रास होतो, असे राज म्हणाले. पण, राज यांची सभा ज्याठिकाणी होती तेथे हॉस्पिटल आणि शाळा आहे. म्हणजेच, शांतता क्षेत्रात राज यांच्या सभेचे भले मोठे स्पीकर कसे लावले होते, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.