मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षकांच्या बदल्या केलेल्या नाहीत, या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जाणार असून त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. या बदल्यांमधून डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ.विनय कोरे, रईस शेख यांनी विधानसभेत विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात २ लाख २७ हजार ५९१ शिक्षकांची पदे रिक्त असून कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १३०४ इतकी आहे. सुगम आणि दुर्गम भागात शिक्षक बदल्यांच्या निकषात बरीच तफावत असून शिक्षण धोरणानुसार सगळ्या शाळेत समान शिक्षक असणे अनिवार्य असल्याने बदल्यांच्या निकषातील तफावत दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात ४७ दुर्गम गावे असून त्यातील १५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, या वर्षी होणाऱ्या बदल्यांमध्ये या रिक्त जागा भरण्यात येतील, असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले. नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करणार
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात येणार आहे. भविष्यात वेतन थकणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
विधानसभेत सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकांच्या मानधनासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हरिभाऊ बागडे, बाळासाहेब देशमुख, प्रकाश आबिटकर, कैलास पाटील, महेश लांडगे यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. राज्यात दोन सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून, त्या अनुषंगाने कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३६ कोटीचे वितरण तत्काळ करण्यात येणार आहे. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार वेतन दिले जात नसेल, तर संबंधित कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
शववाहिका आणि रूग्णवाहिकेच्या डिझेलचा खर्चही शासन देणार असून जननी शिशुंसाठी असलेली 102 क्रमांकाची रूग्णवाहिका सर्व ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे. अपघातासाठी 108 क्रमांकाच्या जुन्या एक हजार रूग्णवाहिका बदलण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.