जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादे विधान वादग्रस्त आहे की नाही, हे संबंधित व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनही बरेचदा कळत असते. खरे तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी असेच एक विधान केले आणि या विधानावरून त्यांना आता चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. कारण त्यांनी हे विधान थेट देवावरून केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या भाषणात स्वाभाविकच अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शेतकऱ्यांचे झालेले हाल हे विषय आले. त्यात याच विषयाचा धागा पकडून त्यांनी हे विधान केले. ‘आता हा अवेळी पडणारा पाऊस आहे. त्यामुळे आम्ही तर आमचे सरकार आल्यापासून पंचनाम्यामध्येच गुंग आहोत. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद पण गारपीट सुरू आहे. आमचे सरकार आल्यापासून लोकच काय देवही विस्कळित आहे,’ असे गुलाबराव पाटील म्हणाले. आता हे विधान त्यांनी अवकाळी पावसाच्या अनुषंगाने केले आहे. पण गुलाबराव पाटील आपल्याच सरकारच्या विरोधात बोलल्याची चर्चा जास्त होत आहे. आमच्या सरकारमुळे लोक विस्कळित आहेत, हे तर ते मान्य करतच आहेत, पण देवही विस्कळित झालेले आहेत, असेही सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, अश्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत. शिंदे गट सत्तेत बसण्यापूर्वीपासूनच गुलाबराव पाटील सोशल मिडियावर गाजले होते.
शिंदे गटातील सर्व आमदार गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना ‘काय झाडी काय डोंगर एकदम ओक्के आहे’ हा त्यांचा दूरध्वनीवरील संवाद जबरदस्त गाजला. त्यावर कित्येक दिवस रिल्स सुरू होते. अनेकांनी त्याला म्युझिक देऊन सोशल मिडियावर पोस्ट केले. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात देवाला ओढले आहे. त्यामुळे त्यांचे विधान गाजत आहे.
शिंदे-ठाकरे गट एकत्र
चर्मकार समाजाच्या मेळाव्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ व्यासपीठावर एकत्र होते. शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघेही सातत्याने एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. त्यामुळे या दोघांना प्रथमच एकाच व्यासपीठावर बघून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
नेत्याला हे करावेच लागते
राष्ट्रवादीतील राजीनामा प्रकरणाविषयी विचारले असता गुलाबराव पाटील यांनी हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय असल्याचे म्हटले. त्याचवेळी नेता हा पक्ष आणि कार्यकर्त्यांना बांधील असतो आणि तो असलाच पाहिजे. शरद पवार यांनी तेच केले आहे जे एका नेत्याला करावे लागत असते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
Minister Gulabrao Patil Controversial Statement