नाशिक – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विकास प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात नाशिक महापालिकेला एक महत्त्वाची ऑफर दिली आहे. केंद्र सरकार नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. खासकरुन या पार्कसाठी लागणारी जागा आणि अन्य बाबींसाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर मी स्वतः या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करेन, अशी ग्वाही गडकरी यांनी नाशिक महापालिकेला दिला आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तसेच, केंद्र सरकारमध्येही भाजपच आहे. येत्या काही महिन्यातच नासिक महापालिकेची निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत लॉजिस्टिक पार्कसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप पुढाकार घेणार का आणि नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क साकारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे लॉजिस्टिक पार्क
नाशिकमध्ये अंबड, सातपूर, सिन्नरमध्ये माळेगाव आणि मुसळगाव, दिंडोरीत तळेगाव औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतींसाठी लिजिस्टिक पार्कची गरज असते. विविध कंपन्यांमध्ये तयार होणारी उत्पादने या पार्कमध्ये ठेवली जातात. एकप्रकारचे हे मोठे गोदाम आहे. मात्र, येथे केवळ वस्तू किंवा उत्पादने ठेवण्याची सुविधा नसते तर अन्य बहुविध सुविधा असतात. त्यात कार्गो, उत्पादनांचे ग्रेडिंग, वितरण, साठवणूक, फ्रेट स्टेशन आदी सुविधांचा समावेश असतो. या पार्कला उद्योगांच्या दराने वीज पुरवठा होतो. हा पार्क झाल्यास गुंतवणुकीला व उद्योग विकासाला चालना मिळते. नाशिक शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने शहराच्या बाह्य भागात (जेथे शहर सुरू होते) तेथे लॉजिस्टिक पार्क साकारला जाईल. यामुळे सर्व अवजड वाहने या पार्कमध्ये येतील आणि तेथूनच अन्य शहरात जातील. म्हणजे ही अवजड वाहने शहरात येणार नाहीत. यामुळे वेळ, पैसा आणि इंधनाची मोठी बचत होईल.
गडकरींनी दिलेल्या ग्वाहीचा बघा व्हिडिओ
https://twitter.com/PIBMumbai/status/1445038685380960256