नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ प्रवासी घेऊन जाणार्या वाहनांमध्ये कमीत कमी सहा एअरबॅग उपलब्ध करून देणे कार निर्माता कंपन्यांना केंद्र सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की आठ प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांमध्ये आता कमीत कमी सहा एअरबॅग अनिवार्य करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. वाहनातील प्रवाशांचे संरक्षण वाढविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. वाहनांच्या किमती किंवा वाहने कोणत्याही प्रकारचे असले तरी हे पाऊल प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणार आहे.
केंद्र सरकारच्या सध्याच्या निर्णयांतर्गत आता वाहनामध्ये कमीत कमी सहा एअरबॅग लावणे अनिवार्य असेल. मध्यम रेंजच्या कारमध्येसुद्धा या एअरबॅग लावण्यात येणार आहेत. फक्त महागड्याच नव्हे, तर मध्यम रेंजच्या कारमध्येसुद्धा एअर बॅगसारखे सुरक्षा फिचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये मध्यम रेंजच्या कार सेगमेंटमध्ये सुरक्षा उपकरणांसंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने आधीच १ जुलै २०१९ पासून ड्रायव्हर एअरबॅग आणि या वर्षी जानेवारीपासून पुढे बसणार्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग अनिवार्य केले आहेत.
अशा असतील एअरबॅग
एम १ वाहन श्रेणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे आणि मागे दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या समोरून आणि मागून बसलेल्या धडकेचा परिणाम कमी करण्यासाठी चार अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. या दोन्ही बाजूने टोरसो एअरबॅग आणि दोन साइड कर्टेन/ट्यूब एअरबॅगचा समावेश असेल. ते कारच्या सर्व प्रवाशांना कव्हर करतील. नवीन आकडेवारीनुसार २०२० मध्ये एक्स्प्रेस वे सह राष्ट्रीय महामार्गांवर एकूण १,१६,४९६ रस्ते अपघात झाले आहेत. त्यामध्ये ४७,९८४ मृत्यू झाले आहेत.