मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत सध्या एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे तो म्हणजे ते आता पुढे काय करणार भाजपला पाठिंबा देणार का यासंदर्भात शिंदे यांनी स्पष्टता केली आहे.
आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण, बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच आता शिंदे हे भाजपाला पाठिंबा देणारे पत्र राज्यपालांना देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात विचारले असता शिंदे म्हणाले की, अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही. परंतु आम्ही ४०पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आम्ही कुठलाही प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना दिलेला नाही. त्यांनीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
minister eknath shinde on bjp support maharashtra political crisis