मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेतच राहणार की पक्षाला सोडचिठ्ठी देणार याचे संकेत मिळत आहेत. शिंदे यांच्याशी बोलणी करण्यासाठी उद्धव यांनी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठविले होते. शिंदे आणि या दोन्ही नेत्यांची सूरतच्या हॉटेलमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, शिंदे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत.
सूरत येथे शिंदे यांनी नार्वेकर आणि फाटक यांना सडेतोड उत्तर दिले आहे. हिंदुत्वाचा त्याग केलेल्या शिवसेनेत परतणे आता शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर भूमिकेनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. नार्वेकर आणि फाटक यांनी मोबाईलद्वारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांच्याशी शिंदे यांचे बोलणे करुन दिले आहे. त्यात शिंदे यांनी मुख्य प्रस्ताव दिला आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, शिवसेनेचा मुख्य बाणा हा हिंदुत्व आहे. त्यामुळे भाजपशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हवे तर मला मंत्रिपदही देऊ नका पण भाजपसोबत सरकार करा, अशी विनंती त्यांनी केली आहे. यासंदर्भात उद्धव यांनी सांगितले की, आपण आधी मुंबईत या. आपण बसू आणि नक्की चर्चा करु. त्यानंतर आता नार्वेकर आणि फाटक हे मुंबईच्या दिशेने परत निघाले आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती हाताळण्याचे शिवसेनेचे प्रयत्न फारसे फळताना दिसत नाहीत. सुमारे 30 आमदारांसह सुरतच्या हॉटेलमध्ये बसलेले एकनाथ शिंदे कोणत्याही प्रकारे नरमलेले दिसत नाहीत. त्यांचे मन वळवण्यासाठी नार्वेकर आणि फाटक यांना पाठविण्यात आले. मात्र मी हिंदुत्वाच्या पाठीशी असून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे शिंदे यांनी त्यांना बोथटपणे सांगितले. आता मी शिवसेनेत परतणार नाही. शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरील माहितीमधून शिवसेनेला हटविल्याची बाबही दिसून येत आहे.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे मन वळवण्यात अपयश आल्याने उद्धव यांचे दूत रिकाम्या हाताने परतत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी आपापली परिस्थिती हाताळण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी शिंदेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करावे, अशी शिंदे यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
minister eknath shinde message to uddhav thakre political development milind narvekar racindra phatak