मुंबई – एखाद्या विमानात प्रवाशाची तब्येत बिघडल्यावर जाणकार व्यक्ती त्वरित मदतीसाठी धावून येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा व्यक्तींनी प्रवाशांचे जीवही वाचविले आहेत. या यादीमध्ये आता केंद्रीय वित्तराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आपल्या सेवाभावाने सामान्य नागरिकांचेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मन जिंकले आहे. दिल्लीहून मुंबईला येणार्या विमानात त्यांनी एका गंभीर रुग्णावर उपचार करून त्याचा जीव वाचवला. या कृतीचे पंतप्रधान मोदी यांनी तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान ट्विट करून म्हणाले, “मनाने नेमहमीच डॉक्टर! आमचे सहकारी भागवत कराड यांनी रुग्णसेवेची उत्तम भावना दाखवली”.
डॉ. कराड यांना या ट्विटवर शुभेच्छा आणि कौतुकाचे हजारो संदेश मिळत आहेत. नम्रतेने ते सर्वांना प्रत्युत्तरही देत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “कौतुक केल्याबद्दल खूप आभार. मी फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेवा आणि समर्पणाच्या भावनेने नागरिकांना मदत करण्याच्या निर्देशांचे पालन करत आहे”.
नेमके काय झाले
दिल्लीहून मुंबईला जाणार्या इंडिगो विमानात एका प्रवाशाची तब्येत बिघडली. विमानात कोणी डॉक्टर आहे का याबद्दल केबिन क्रूकडून चौकशी करण्यात आली. त्यावर शल्य चिकित्सक असलेले केंद्रीयमंत्री डॉ. भागवत कराड त्वरित मदतीसाठी पुढे आले. त्यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केले आणि विमानातील आपत्कालीन किटमध्ये उपलब्ध असलेले इंजेक्शन दिले. रुग्णाचा रक्तदाब खूपच कमी झाला होता. परंतु डॉ. कराड यांनी त्वरित उपचार सुरू केले. अर्धा तासानंतर रुग्णाला बरे वाटू लागले. त्यादरम्यान डॉ. कराड यांनी मदत केली नसती तर रुग्णाचा मृत्यू झाला असता.
इंडिगोकडून आभार
इंडिगो कंपनीने सुद्धा ट्विट करून डॉ. कराड यांचे आभार मानले. कंपनीने ट्विटमध्ये लिहिले, आपले न थकता कर्तव्य करणार्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आम्ही आभार मानतो. एका प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी स्वेच्छेने धावून येणे ही खूपच प्रेरणादायी कृती होती. डॉ. कराड यांनी जुलै २०२१ रोजी वित्त राज्यमंत्री या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते औरंगाबाद येथील रहिवासी असून. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले आहेत. ते प्रसिद्ध शल्यचिकित्सक सुद्धा आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1460656827385794564