मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वय झाल्यामुळे काकांनी आपल्याकडे सूत्र द्यायला हवी होती, राजकीय तडजोडी करायला नको होत्या या कारणाने अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडणे आणि काकांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे सर्वांनाच स्वाभाविक वाटले. परंतु, ज्यांना बोट धरून राजकारणात आणले आणले त्या दिलीप वळसे-पाटीलांनीही शरद पवार यांच्यावर जहरी टिका करावी, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर वळसे-पाटलांनी घुमजाव केले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून आठ दिग्गज नेत्यांसोबत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नावावर ही मंडळी सत्तेत सामील झाली. यामध्ये प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भूजबळ या अशा तीन नेत्यांचाही समावेश होता, जे अखेरच्या श्वासापर्यंत शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत आणि त्यांच्याबद्दल विरोधात बोलणार नाहीत, याची शाश्वती अख्ख्या महाराष्ट्राला होती. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यातही ही शरद पवारांची खेळी आहे, असेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पण दिलीप वळसे पाटील यांनी काल मंचरच्या कार्यक्रमात जाहीरपणे शरद पवारांच्या राजकारणावर टिका केली, त्यावेळी मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. देशातील सर्वांत मोठा नेता म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. त्यांना विरोधी आघाडीतही सर्वांत मोठे स्थान आहे. पण एवढी वर्षे होऊनही शरद पवारांना महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणता आली नाही. ममता बॅनर्जी, मायावती ही मंडळी आपापल्या राज्यात एकहाती सत्ता आणतात आणि मुख्यमंत्री होतात. पण शरद पवार यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करता आला नाही. निवडणुका जिंकल्यावर दुसऱ्या पक्षांसोबत आघाडी करण्याशिवाय दुसरे काहीच झाले नाही, अशी टिका दिलीप वळसे पाटील यांनी केली.
हे तर नवीनच
आपण अजूनही भाजप सोबत गेलेलो नाही तर आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँगेस हाच आहे. आपण अजूनही राष्ट्रवादी काँगेस पक्षामध्येच आहोत. चिन्ह कोणाला मिळेल, नाव कोणाला मिळेल याबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. मात्र त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक पंचायत होऊ शकते, अशी नवीनच माहिती वळसे पाटील यांनी दिली.
आपण काय करत होतात?
शरद पवारांवर टिका केली की नातू रोहित पवार त्याला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. त्यांनी दिलीप वळसे पाटील यांनाही उत्तर दिले आहे. एवढी वर्षे आपण शरद पवार यांच्यासोबत होतात, तेव्हा आपण जबाबदारी का पाडली नाही? राष्ट्रवादीचे एकहाती सरकार येऊ शकले नाही, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, याला आपणही जबाबदार आहात, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.
आता केला हा खुलासा
यासंदर्भात वळसे-पाटील यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे. माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असे त्यांनी म्हटले आहे.
Minister Dilip Walse Patil on Sharad Pawar Politics NCP
Pune Manchar Clarification Critic