इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे मंत्री धनजंय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो मी स्विकारला असून तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुध्दा वेग आला होता. त्यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर धनजंय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. हा राजीनामा नैतिकतेमुळे दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तर विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पाय-यावर जोरदार आंदोलन केले आहे.
राज्यात सर्वत्र संताप
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आज मनोज जरांगे यांनी तर फडणवीस व अजीत पवार यांनी त्यांना लाथ मारुन बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओं व्हायरल झाले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एवढं होऊन सुध्दा वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळते असे सांगत संताप व्यक्त केला आहे.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, हे फोटो बघून महाराष्ट्र सुन्न झालाय. संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणाऱ्या या हैवानांना फाशी दिलं तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल असंच एकंदर हे हत्याकांड आहे. हे रक्तरंजीत फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात संतापाची त्सुनामी उसळलीय आणि याच संतापातून उद्या महाराष्ट्राच्या भावनेचा उद्रेक झाला तर आश्चर्य वाटणार नाही.
या हत्याकांडात जात आणि धर्माचा काय संबंध? माणुसकी जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याने मस्तवाल सरकारला आतातरी जाग येणार का? आणि आरोपींच्या रेंजमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही पवार यांनी केला.
तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहित होतं. संतोषअण्णाच्या बाबतीतलं हे क्रौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधाडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे. ही माणसं नाहीत.. आणि यांचं क्रौर्य निमूट पणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत? असा प्रश्न केला आहे. हा सर्व संताप बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे.