नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी रिक्त शिक्षक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली. मुंबईमध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यातील जे शिक्षक भिवंडीमध्ये जाण्यास तयार असतील त्यांना याठिकाणी पाठवले जाईल. भिवंडीमध्ये पर्यायी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत यापुढे जिल्हा बदली केली जाणार नाही, अशी माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.
शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉ. भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला.
शालेय पोषण आहार योजनेच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करणार – मंत्री दीपक केसरकर
शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. या योजनेबद्दल कुठेही तक्रारी असतील तर त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, राज्यात यावर्षी शालेय पोषण आहार योजनेसाठी १६८२ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी या योजनेवर आतापर्यंत ८९२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अन्न महामंडळाकडून राज्याला तांदूळ पुरवठा करण्यात येतो. कडधान्ये खरेदी राज्य शासन करते. शालेय पातळीवर स्थानिक समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थांना चांगला आहार देण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
या योजनेसंदर्भात काही तक्रारी असतील अथवा काही प्रकार घडले असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. निश्चितपणे या योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य बबन शिंदे, अशोक पवार यांनी सहभाग घेतला.
Minister Deepak Kesarkar on Education Issues
Teachers Recruitment Shaley Poshan Aahar