मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीतील सभा फसल्याचा दावा करीत विरोधकांकडून चिमटे काढले जात आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. शिंदे गटाकडून हल्ला चढविणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचाही क्रम सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या विजयासंदर्भात गौप्यस्फोट करीत खळबळ उडवून दिली आहे. आदित्य ठाकरे पराभूत होतील म्हणून शिवसेना विरोधकांना घाबरली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आल्याचे गुपीत त्यांनी उलगडले.
केसरकर म्हणाले की, तरुणाला कोणीही घाबरत नाही. एक तर आदित्य ठाकरे यांना निवडणुकीला उभे केले. तेव्हा ते विरोधकांना घाबरले. सचिन अहिर यांना विनंती करून आपल्या पक्षात घेतले. त्यानंतर उमेदवारी भरू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्यांना आमदार केले. हा सर्व इतिहास असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
एका विजयासाठी दोन एमएलसी
एका आमदारापाठी दोन एमएलसी असे करून लोक जिंकलेत. असेच चालले तर लोकशाहीचा ढाचाच कोसळेल. हे करणारे आदित्य ठाकरे आहेत. दुसरे तिसरे कोणी नाही. त्यांच्यासाठी दोनच काय चार एमएलसी करा. आम्हाला काही म्हणायचे नाही. तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. पण जे नेते लोकांचा आशीर्वाद घेऊन विजयी होतात. त्यांच्यावर बोट दाखवू नका, असा टोला त्यांनी लगावला. एका मतदारसंघासाठी दोन एमएलसी करायच्या तर आपली आमदार संख्या 288 आहे. ती 560 करावी लागेल, असे गणितही त्यांनी मांडले.
कॅबिनेटमध्येही संधी मिळाली असती
मंत्रीपद देऊ नका. मी मंत्रिपदासाठी हे करत नाही. असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. पण, मलाही तेव्हा इतरांकडून अनेक ऑफर होत्या. मीही त्या ऑफर स्वीकारल्या असत्या तर कॅबिनेट मंत्री झालो असतो, असा दावाही त्यांनी केला.
Minister Deepak Kesarkar on Aditya Thackeray Election Politics