नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही असा अजब सल्ला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असताना भुसेचे हे वक्तव्य आले आहे.
आज सकाळपासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कांदा निर्यात शुल्कावरून आंदोलने करण्यात आली. तर जिल्हयातील कांदा व्यापा-यांनी बेमुदत लिलाव बंद पुकारले आहे. त्याचवेळी दादा भुसे यांचे हे वक्तव्य आले आहे. दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला, तर काही प्राब्लेम नाही. ज्यावेळी आपण १ लाखांची गाडी वापरतो, त्यावेळी १० रुपये जास्त देऊन २० रुपये देऊन माल खरेदी करावा. ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडत नाही, असे भुसे म्हणाले…
यावेळी भुसे यांनी सांगितले की, कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार, यावर देखील व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. त्यावर केंद्र सरकार निश्चितच सकारात्मक मार्ग काढेल, त्यामुळे हा सत्ताधारी, विरोधक असा विषय नाही. काही वेळा कांद्याला २०० ते ३०० भाव मिळतात, तर काही वेळा २ हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावे लागते. तसेच नाशिक जिल्ह्यातील हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे नियोजन केले जाईल असेही सांगितले.
Minister Dada Bhuse Statement On Onion Export