नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे गटातील नाराजी आणि धुसफूस याबाबत आता नाशिकचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. भुसे हे विश्वासात घेतले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. केवळ भुसेच नाही तर खासदार हेमंत गोडसे यांच्यावरही कांदे यांनी निशाणा साधला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी म्हटले होते. नाशिकमध्ये शिंदे गटाचे कार्यालय सुरू झाले आहे पण ते कुठे आहे हे सुद्धा मला माहित नसल्याचे कांदे म्हणाले होते. हे कार्यालय खासदार गोडसे यांच्या कार्यालयालगतच आहे. त्यावरुनही कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षात कुठलीही नाराजी नाही. आमच्या कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही काल सुद्धा सोबत होतो. आजही आहोत. काहीही चिंता करण्याचे कारण नाही, असे भुसे यांनी सांगितले आहे.
राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता येऊन अवघे चार महिने झाले आहेत. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करुन वेगळी चूल मांडली आहे. आणि आता शिंदे गटातच नाराजीचे फटाके फुटत असल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांच्या रुपाने ते समोर आले आहे. त्यामुळे शिंदे गटातील हालचाली आणि नाराजीबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Minister Dada Bhuse on Shinde Group Politics
Suhas Kande Nashik District