मालेगाव – ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नसून नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज दाखल करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित ब-सत्ता प्रकाराच्या कामकाजाची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे, नगर भुमापन अधिकारी किरण चौधरी, उप अधिक्षक भुमी अभिलेख राहुल पाटील, दुय्यम निबंधक श्री.भोये, वाघ, लहाने, बंडू माहेश्वरी, राजेंद्र साळुंखे, शाम अग्रवाल, रणभोर, सखाराम घोडके, किशोर बच्छाव, ॲड.सतिष कजवाडकर, ॲड.बच्छाव यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
ब-सत्ता प्रकरणांचा धारणाधिकार रुपांतरीत करण्यासह यातून झालेल्या शासकीय वसुलीच्या कामाचा आढावा घेवून समाधान व्यक्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, उर्वरित सर्व ब-सत्ता प्रकार मिळकत धारकांना शासनाच्या मार्गदर्शक सुचना माहित होण्यासाठी वैयक्तीक नोटीसीने कळविण्यासह याबाबत जनजागृती होण्यासाठी शिबीरांचे आयोजन करुन उर्वरित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. संबंधित अर्जदार यांचेकडून कमीत कमी कागदपत्रे प्राप्त करुन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उप अधिक्षक भुमी अभिलेख, नगर भुमापन, दुय्यम निबंधक व अपर जिल्हाधिकारी या कार्यालयांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. तसेच झालेल्या प्रगतीकामाचा आढावा घेण्यासाठी नियमीतपणे बैठकांचे आयोजन करण्याबाबतही मंत्री श्री.भुसे यांनी सुचना दिल्या.