धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री दादा भुसे यांना आज जिल्हा दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतनिधी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. भुसे यांच्या समोरच शेतकऱ्यांनी ५० खोके, एकदम ओके अशा जोरदार घोषणा केल्या. त्याचवेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडेही दाखविले. त्यामुळे येथील वातावरण खुपच तणावपूर्ण झाले. अखेर भुसे यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलवून शांत केले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर मदतनिधी लवकरच जमा करण्यात येईल. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कासारे, ता. साक्री येथे मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते आज सकाळी बसस्थानक चौक सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, कासारेचे सरपंच विशाल देसले, उपसरपंच फातिमा पठाण, सुवर्णा देसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी, डॉ.तुळशीराम गावीत, सतीश महाले आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. या सरकारने सुरवातीलाच पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. त्याचा सर्वांनाच लाभ होत आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे याचा फायदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
कासारे ग्रामपंचायतीने केलेली विकास कामे अनुकरणीय आहेत. ग्रामपंचायतीतर्फे साकारण्यात येणारे महापुरुषांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल. साक्रीसह कासारे परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. गणेशपूर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर असून पावसाळ्यानंतर त्याचे काम सुरू होईल असेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध गावाचे सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते परिसरातील गावांच्या सरपंचाचा सत्कार करण्यात आला.
https://twitter.com/BodkheShilpa/status/1565999462497288192?s=20&t=EuX4BooAcmpa3kEXD5lnvg
Minister Dada Bhuse Dhule Tour Farmer Aggressive
Slogan Agitation Help