नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांठिया कमिशनचे काम सध्या जोरात सुरु आहे. ओबीसी आरक्षणासाठीचा डेटा लवकरच गोळा होईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच, आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाद्वारे होतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.
भुजबळ म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोग त्याप्रमाणे कामाला लागले असून पावसाचा अंदाज बघून कोर्टाच्या निर्देशानुसार निवडणूक राबवली जाईल. निवडणूक आयोग मतदार याद्या आणि इतर काम करत असतानाच राज्य सरकारने नेमलेले बांठिया कमिशनदेखील रात्रंदिवस डाटा गोळा करण्याचे काम करत आहे. शासनाकडून त्यांना सर्व ती मदत देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अधिकारी या कामात मदत करत आहेत. मध्य प्रदेशने ज्या प्रकारे काम केले, तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न कमिशन करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे १५ ते २० दिवसांत काम संपेल. त्यानंतर सुप्रीम कोर्टाला आम्ही मध्य प्रदेशप्रमाणे ओबीसी आरक्षणासहीत निवडणूक घेण्यासंदंर्भात परवानगी मागू. मध्य प्रदेशप्रमाणे आपल्याला परवानगी मिळण्यास अडचण येणार नाही, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
https://twitter.com/NCPspeaks/status/1531930161599610880?s=20&t=ZHcYu1-2DR4KLa0soC5BRw