नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत मदन पारख यांचे काल अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आले होते. नाशिक पोलिसांच्या कारवाई नंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पारख हे त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उद्योजक पारख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पारख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी पोलीस यंत्रणेशी चर्चा करून पारख यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याचा सूचना केल्या. तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जरब निर्माण करून गुन्हेगारीचा बीमोड करावा असे आदेश त्यांनी दिले. तसेच पारख कुटुंबीयांना योग्य ते संरक्षण देऊन गुन्हेगारांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असे आश्वस्त केले.
असे झाले हेमंत पारख यांचे अपहरण, नंतर सुटका
हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून अपहरण करण्यात आले. चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी हे अपहरण केले. शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला. शनिवारी रात्री चार गुंड वाहनातून आले. त्यानंतर त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत बळजबरीने बसविले. त्यानंतर त्यांनी कार सुसाट वेगाने चालवत पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राहत्या घराच्या येथून पारख यांचे अपहरण झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का त्यांचे कुणाशी भांडण होते का, कोणी धमकी दिली होती हे पोलिसांनी तपासून पाहिले. पोलिसांना मध्यरात्री पारख यांचे शेवटचे लोकशन अंबेबहुला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरु असतांना पारख यांना सूरत येथे सोडून देण्यात आले.
Kidnapping of Nashik construction businessman Hemant Parkh
Minister Chhagan Bhujbal Meet Hemant Parakh Kidnapping Case
Nashik