नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत आज मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, विंचूर, अंदरसूल, मुंगसे, ताराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून उद्या येवल्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात आता एकूण १६ ठिकाणी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरु असणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपयांनी २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत आहे. यासाठी राज्यात लासलगाव, विंचूर, अंदरसूल, पिंपळगाव बसवंत, मुंगसे, ताराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा, तिसगाव, वैजापूर, आगर, पारनेर, व अहमदनगर येथे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येत आहे. ही केंद्रांची संख्या अधिक वाढविण्यात यावी याबाबत आज मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी तसेच नाफेडचे व्यवस्थापक निखिल पाडाडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यानुसार उद्यापासून येवल्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असून राज्यात १६ ठिकाणी नाफेडच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरु झाली आहेत. त्यामुळे कांदा उप्तादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Minister Chhagan Bhujbal Call Piyush Goyal Demand Onion Issue