पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चार दिवसांपूर्वी शाई फेकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली. त्याची दखल घेत मंत्री पाटील यांनी त्यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात विशेष खबरदारी घेतली. त्यामुळे त्याची दिवसभर मोठी चर्चा होती.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. अशामध्ये आता पुन्हा एकदा त्यांच्यावर शाईफेक करण्याची धमकी सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. या धमकीनंतर चंद्रकांत पाटील सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून चेहऱ्यावर थेट प्लास्टिकचे मास्क लावल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मास्क लावूनच त्यांनी भाषण केले याशिवाय धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले यांच्याकडून ही धमकी देण्यात आली. त्यांच्याविरोधात पिंपरीमधील सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप समारासमोर आले आहे. त्यातच विकास लोले यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर, ‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु.पो.सांगवी’, ‘पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या’, आणि ‘चंपाच तोंड काळे करा रे’ अशा धमकीच्या आशयाच्या काही पोस्ट केल्या. त्यावरून आता मोठा वाद सुरु झाला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर विकास लोले आणि दशरथ पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानावरुन राज्यभरात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे गेल्या आठवड्यात शाईफेकही करण्यात आली होती.
Minister Chandrakant Patil Ink Throwing Threat Protection Mask