औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे मंत्री आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. हॉस्पिटलमध्ये जनरेटरही नसल्याचे यावेळी भुमरे यांच्या निदर्शनास आले. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करत तीव्र संताप व्यक्त केला. अखेर या घटनेमुळे रुग्णालयाला कायमस्वरुपी जनरेटर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. पाहणी करत असताना भुमरे सरकारी दवाखान्याच्या दंत चिकित्सा विभागात पोहोचले. भुमरेंनी व्यवस्थेची विचारपूस केली. आणि त्यानंतर त्यांच्या दातांची तक्रार डॉक्टरांना सांगितली. तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. मग भुमरेंनी आधी रुट कॅनल केले आणि त्यानंतर शस्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले. खुद्द मंत्र्यांची शस्रक्रिया म्हटल्यावर सर्व डॉक्टर हजर राहिले. मात्र, ऐनवेळी लाईट गेली आणि सगळाच गोंधळ उडाला.
असा सावरला प्रसंग
ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित असल्यामुळे सर्वांनी एकाचवेळी मोबाईल टॉर्च वापरुन ऑपरेशन पार पाडलं. ऑपरेशननंतर दवाखान्यात जनरेटर कसा नाही म्हणून भुमरेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही. आता जनरेटर नसताना अचानक लाईट गेल्यावर काय होतं, याचा अनुभव खुद्द मंत्री संदीपान भुमरेंनाच आला होता. त्यामुळे भुमरेंनी दवाखान्यातुन जनरेटरचा प्रस्ताव तातीडनं मंजुरीचे निर्देश दिले.
सामान्यांची समस्या कळली..
जोपर्यंत नवा जनरेटर पोहोचत नाही. तोपर्यंत कोविड सेंटरमधला जनरेटर सरकारी दवाखान्यात नेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. साध्या दाताच्या ऑपरेशनसाठी लाईट गेल्यावर काय होते याची प्रचिती मंत्री भुमरेंना आली. मात्र, ज्या सरकारी रुग्णालयांची व्यवस्थाच अंधारात आहे, तिथं सामान्यांना काय-काय त्रास अनुभवावा लागत असेल. तूर्तास किमान मंत्रीमहोदयाच्या ऑपरेशन निमित्तानं का असेना, औरंगाबादच्या रुग्णालयात जनरेटर येणार ही चांगली गोष्ट घडली. तसेच संदीपान भुमरे स्वतः मंत्री असूनही त्यांनी सरकारी दवाखान्यात दाताचं ऑपरेशन केलं. याबद्दल त्यांचंही कौतुकही होत आहे.
Minister Bhumre Operation Hospital Generator Availability