इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याचे शालेय शिक्षण आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने २ महिने सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कडू यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, या निकालाला कडू यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कडू हे अचलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची माहिती सादर केली नाही. ही बाब चांदूरबाजार येथील भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे तिरमारे यांनी २०१७ मध्ये याबाबत रितसर तक्रार केली. याप्रकरणाची सुनावणी चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुरू होती. त्याचा आज निकाल लागला आहे. लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ चे कडू यांनी उल्लंघन केले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी कडू यांना २ महिने सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या शिक्षेविरोधात कडू यांना उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. त्याबाबत त्यांच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.