विशेष प्रतिनिधी, मुंबई
परिवहन विभागातील (आरटीओ) बढती आणि बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये घेत असल्याचा आरोप ताजा असतानाच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एकीकडे आरटीओ प्रकरणाची चौकशी तर दुसरीकडे रिसॉर्टची चौकशी अशा कैचीत परब सापडले आहेत.
यापूर्वी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे दोघांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा तिसऱ्यांदा असा प्रकार घडत असल्याने कोरोना, लॉकडाऊन, चक्रीवादळ आदी संकटांमुळे आधीच त्रस्त झालेले ठाकरे सरकार मंत्र्यांवरील आरोपांमुळेही अडचणीत आले आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली तसेच सोमय्या यांनी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी या रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश दिले मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत, असे ट्वीट करून खुद्द सोमय्या यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी अनिल परब यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केले होते. संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
विशेष म्हणजे सोमय्या यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेऊन मंत्री अनिल परब यांच्या संबंधी तक्रार केली होती. यावेळी सोमय्या यांनी आरोप केला की, लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटीच्या काळा पैशातून बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला आहे. त्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार असून ईडी, सीबीआय, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही तक्रार केली आहे, असे ट्वीट करत सोमय्या यांनी परब यांच्याविरोधात गंभीर आरोप केला होता.
तर दुसरीकडे सोमय्या यांच्या या आरोपांबाबत विचारले असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही योग्य त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असे अनिल परब म्हणाले होते.
यापुर्वी ठाकरे सरकार मधील शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दररोज १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांचासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता.
विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्त्याने टीका केली होती. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा उल्लेख करुन तेसुद्धा लवकरच जातील, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.