नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नाशिकच्या पर्यटन आणि पर्यावरण विभागाचा आढावा घेणार आहेत. खासकरुन राज्यपातळीवर गाजलेल्या २०० वर्षे जुन्या वडाच्या वृक्षाच्या ठिकाणालाही ते भेट देणार आहेत.
येत्या गुरुवारी (२७ जानेवारी) सायंकाळी ते नाशिकमध्ये येणार आहेत. गंगापूर रोडवरील बोटक्लब येथे ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक घेणार आहेत. त्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन प्रकल्पांचा आढावा ते घेतील. शुक्रवारी (२८ जानेवारी) सकाळी ते शेंद्रेपाडा आणि सावरपाडा या दोन आदिवासी पाड्यांना भेट देणार आहेत. या गावांना पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागत आहे. या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात ते ग्रामस्थांची भेट घेणार आहेत.
नाशिक शहरात उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या कामात तेथील म्हसोबा मंदिरालगतचे २०० वर्षे जुने वडाचे झाड तोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले. ही बाब राज्य पातळीवरच गाजली. त्याची तत्काळ दखल घेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनवर चर्चा केली. हे झाड न तोडता अन्य काही पर्याय आहे का, त्याचा विचार करण्याचे त्यांनी सूचित केले. आता याच झाडाची पाहणी आदित्य ठाकरे हे करणार आहेत. दुपारुन ते नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयात जाणार आहेत. तेथे ते नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा आढावा आणि माझी वसुंधरा या मोहिमेचाही आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.