मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अब्दूल सत्तार कृषीमंत्री असताना अनेक बाबतीत त्यांच्यावर आरोप झाले. कधी त्यांच्या सांगण्यावरून बेकायदा धाडी टाकण्यापासून ते अवैधरित्या पैसा गोळा करण्यापर्यंत. त्यांच्या कार्यकाळात एक महोत्सव असाच गैरव्यवहारासाठी गाजला होता. आणि गंमत म्हणजे एवढे होऊनही सरकारने त्याच महोत्सवासाठी आता पुन्हा एकदा पैसे मंजूर केले आहेत.
सिलोड कृषी कला व क्रीडा महोत्सव अब्दूल सत्तार कृषी मंत्री असतानाही झाला होता. या महोत्सवासाठी बेकायदेशीररित्या लोकांकडून पैसा गोळा केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर त्यावर चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी अद्याप संपलेली नसतानाच सरकारने यावर्षीच्या महोत्सवासाठी ५४ लाख ७१ हजार २८३ रुपये मंजूरही केले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने १७ अ़ॉगस्टला अध्यादेश काढला आहे. महोत्सवाला एकूण दोन कोटी ६४ लाख १५ हजार २६० रुपये देय आहेत. त्यापैकी एक कोटी ८६ लाख ७ हजार ५१३ रुपये उपलब्ध आहेत.
उर्वरित ७८ लाख ७ हजार ७४७ रुपयांची गरज आहे. त्यांपैकी २३ लाख ६४ हजार ४६४ रुपयांचा निधी ३१ मार्च २०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरित ५४ लाख ७१ हजार २८३ रुपयांचा निधी २०२३-२४च्या ‘जिल्हा कृषी महोत्सव’ या योजनेतून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे अध्यादेशात स्पष्ट नमूद आहे. सत्तार यांनी १ ते १० जानेवारी या कालावधीत सिल्लोड कृषी, कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवासाठी बेकायदा पैसे गोळा केल्याचे समोर आल्यामुळे हा महोत्सव वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली आणि चौकशीचे आदेशही देण्यात आले.
प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
सिल्लोड कृषी महोत्सवासाठी बेकायदेशीररित्या किती पैसे गोळा करण्यात आले, कृषी अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देऊन किती रक्कम गोळा करण्यात आली, या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी होते, या प्रश्नांची उत्तरे चौकशीत शोधणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात चौकशीचे पुढे काही झालेच नाही.
Minister Abdul Sattar Sillod Agri Fest Government Fund
Controversy Aurangabad Agriculture krushi Mahotsav