मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर खोके घेतल्याचा आरोप शिंदे गटावर होत आहे. त्यानंतर राज्यभरात शिंदे गट विरोधात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप सुरू केले आहेत. त्यानंतर रोजच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेत वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले संप्तत झाले असून त्यांनी सत्तार यांनी ताबडतोब माफी मागावी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार निदर्शने करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. बंडखोरीपासून विरोधक शिंदे व त्यांच्या समर्थकांवर तुटून पडले आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपुर्वी असाच आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर केला होता. तेव्हा सत्तार यांनी तुम्हाला काही खोके पाहिजे का? असा पलटवार केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, की तुम्हाला मिळाले असतील म्हणूनच तुम्ही आॅफर करता आहात का ?. या संदर्भात सिल्लोडमध्ये एका मिडीया प्रतिनिधीशी बोलत असता, सत्तारांनी पातळी सोडत सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्हालाही देवू, असे म्हणतांना वादग्रस्त भाषा वापरली. सिल्लोड येथे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पाहण्यासाठी ते नगर परिषदेसमोरील मैदानावर आले होते. यावेळी सत्तारांनी पातळी सोडून टीका केली.
सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे. ज्यांना खोक्यांची आठवण येत आहे, त्यांच्यासाठी मी सिल्लोडला एक दवाखाना उभारतो. या दवाखान्यात खोक्यांची आठवण येणाऱ्या नेत्यांची डोकी तपासू, असे म्हटले आहे.
या संदर्भात सत्तार यांचा निषेध व्यक्त करताना यांचा निषेध व्यक्त करताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, सत्तार यांना कृषिमंत्री केले हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी केली पाहिजे, असे मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना नेहमी सांगत आलो आहे. या माणसाची हकाल पट्टी केली पाहिजे, अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली. तसेच
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सत्तार यांच्या विधानावर निषेध नोंदवला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृषी मंत्री असो की अन्य कुणी. कुणीही महिलांबद्दल अपशब्द वापरता कामा नये. कोणी कोणत्याही पक्षाचा असो महिलांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. वैयक्तीक टीका आणि अपशब्द टाळलेच पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या. अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त विधान आल्यानंतर त्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी येत्या २४ तासात माफी मागावी अन्यथा त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू, असा इशाराच सलगर यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही सत्तार यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहात तरी विकृता सारखे अपशब्द वापरत आहात, असे म्हटले आहे.
Minister Abdul Sattar Controversial Statement MP Supriya Sule