मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-भाजप युतीचे सरकार गेल्या एक वर्षांपासून रुसवे-फुगवे आणि कधी आनंदाच्या वातावरणात टिकलेले आहे. एकहाती सत्ता नसल्यामुळे अशा युतींमध्ये कुठला ना कुठला बेबनाव असतोच. अशावेळी मंत्र्यांना मोठे सावधन राहावे लागते. पण अब्दूल सत्तारांकडून एक अशी चूक झाली की, त्याचे स्पष्टीकरण देण्याची संधीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली नाही. त्यामुळे भाजपपाठोपाठ एकनाथ शिंदेही सत्तार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सत्तार यांचे मंत्रीपद जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अकोला येथे कृषी विभागाच्या वतीने छापेमारी झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. छापेमारी करणाऱ्यांमध्ये कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्या स्वीय सहायकाचाही समावेश होता. या कथित छापेमारीमध्ये बियाणे व्यापाऱ्यांकडून लाच मागितल्याचेही पुढे आले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली. कारण ही छापेमारी कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्या नावाने करण्यात आली होती. दोघांच्याही नाराजीनंतर अब्दूल सत्तार यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे आणि फडणवीस यांनी सत्तार यांचा खुलासाही ऐकून घेतला नाही. दोघांनी सत्तारांना कुठल्याही प्रकारचे अभय दिल नाही किंवा त्यांचे ऐकूनही घेतले नाही. अब्दूल सत्तार यांचे स्वीय सहायक दीपक गवळी यांनी अकोल्यातील बियाणे गोदामांवर अनधिकृत छापेमारी करीत लाचही मागण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
सत्तारांचेच पीए
चार दिवसांपूर्वी सत्तार यांनी दीपक गवळी आपले स्वीय सहायक नसल्याचा दावा केला होता. त्याचवेळी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले होते. पण, सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याचा दाखला देत दीपक गवळी हे सत्तारांचेच पीए असल्याचे सिद्ध होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
कारवाईसाठी पथक
संयुक्त कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्य़ांच्या अध्यक्षतेत एक पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात कृषी, महसूल आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. हे पथक बनावट बियाणांबाबत संयुक्त कारवाई करणार आहे.